संगीत प्रस्तुतीत धम्मधृपदाने दिली धम्मानुभूती

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्ध अभ्यास केंद्र आणि संगीत व नाट्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने धम्मधृपद ही विशेष संगीत प्रस्तुती एमजीएम परिसरातील चिंतन गाह येथे संपन्न झाली. भोपाळ येथील सुप्रसिद्ध धृपद गायिका सुरेखा कांबळे यांनी त्यांच्या संचासह धम्म, तत्वज्ञान आणि धृपद यांचा अनोखा मिलाप
करून विलक्षण संगीत प्रस्तुती केली.
ओम मणि पद्म हूं या जपाने प्रारंभ करीत त्यांनी श्रोत्यांना उत्तमोत्तम रचनांची मेजवानी देत खऱ्या अर्थाने धम्मानुभूती दिली. बुद्धं शरणं गच्छामि, गौतम शाक्य मुनि यासारख्या धम्म तत्वज्ञानाला केंद्रित रचना धृपदासारख्या अत्यंत प्राचीन असलेल्या प्रकारामध्ये प्रथमच अनुभवायला मिळाल्या. सुरेखा कांबळे यांना सारंगीवर हनीब हुसैन, पखवाजवर गोपाळ जाधव, तंबोऱ्यावर
मोहिनी पटेल आणि एमजीएमची विद्यार्थिनी गार्गी आडे यांनी साथसंगत केली. एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांच्या कल्पक दृष्टीतून आणि धम्मचिंतनातून प्रस्तुत धम्मधृपद या संगीत प्रस्तुतीचे आयोजन करण्यात आले. संगीत सभेचे उद्घाटन प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांनी केले. सूत्रसंचालन संगीत विभागाच्या डॉ. मेधा लखपति यांनी केले. अधिष्ठाता डॉ. जॉन चेल्लादुराई यांनी आभार मानत धम्म आणि धृपदाचा हा सुंदर मिलाप नावीन्यपूर्ण संकल्पना असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. विलास सपकाळ, अधिष्ठाता डॉ. जॉन चेल्लादुराई, अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, प्रा.डॉ. संजय मोहड, डॉ. योगिता महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions